मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत नणंदेच्या जागी शिक्षिका म्हणून वहिनी काम करताना आढळून आली आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर आता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.
हे संपूर्ण प्रकरण जिल्हा शिक्षण केंद्र सिहावाल अंतर्गत हटवा खास येथील प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. सोनम सोनी या शिक्षिका म्हणून काम करत असल्याची नोंद कागदपत्रांवर करण्यात आलीआहे. पण प्रत्यक्षात मात्र शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी तिची वहिनी शुभी सोनी येत असे.
खरी शिक्षिका सोनम सोनी ही तिच्या पतीसोबत सासरच्या घरी राहते, अशी माहिती आता समोर आली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर आता जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे.
सीधी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्रेमलाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, माध्यमांमुळे ही बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
यापूर्वी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे अशीक एक धक्कादायक घटना समोर आली होती. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या एका बनावट उमेदवाराला पकडले होते. संशय आल्याने पर्यवेक्षकांनी परीक्षा देणाऱ्या मुलाची चौकशी केली आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. मुलगा त्याच्या मित्राच्या जागी परीक्षा देण्यासाठी आला होता, असे सांगण्यात आले.