नवी दिल्ली - 'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाचा ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देशात ब्लॅक फंगसचा धोका वाढल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही रुग्णालयातील ब्लॅक फंगसच्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
बिहारच्या भागलपूरमध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मायागंज रुग्णालयातील म्युकोरमायसिसच्या रुग्णांना योग्य ते उपचार आणि सोयीसुविधा मिळत नसल्याची बाब आता उघड झाली आहे. इंजेक्शन आणि ऑपरेशनसाठी मशीन नसल्याने ब्लॅक फंगसचे रुग्ण तडफडत आहेत. ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र रुग्णालयात त्यावर उपचारच होत नसल्याने लोकांना आरोग्य विषयक अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
मायागंज रुग्णालयात ब्लॅक फंगसचे 20 रुग्ण सध्या उपचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र यातील चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची देखील मोठी कमतरता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशनसाठी लागणाऱ्या डिब्राइडर मशीनच्या खरेदीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. मशीन मिळाल्यानंतर ब्लॅक फंगसवरील रुग्णांवर सर्जरी करण्यात येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दिल्लीमध्ये ब्लॅक फंगसने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांपेक्षा Black Fungus च्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र यासाठी लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांनी डॉ़क्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय स्टेरॉईड घेतले आहेत. तसेच घरी ऑक्सिजन सिलिंडरचा देखील वापर केला असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये 6 जुलै रोजी कोरोनाचे 833 सक्रिय रुग्ण होते. तर ब्लॅक फंगसचे 952 रुग्ण आहेत. यातील 402 जणांवर खासगी रुग्णालयात आणि 302 रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 1656 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनातून बरं झाल्यावर अनेक रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याची माहिती दिली आहे.