नवी दिल्ली - गेल्या महिन्यात झालेल्या संगरूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सिमरनजित सिंग मान यांनी आपच्या उमेदवाराचा पराभव करत सनसनाटी विजय मिळवला होता. दरम्यान, खलिस्तान समर्थन नेते अशी ओळख असलेल्या मान यांनी आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेत खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी भगत सिंग हे दहशतवादी होते या विधानावर आपण ठाम असल्याचे सांगितले. तसेच वेगळ्या खलिस्तानच्या मागणीलाही आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिमरनजित सिंग मान यांनी पंजाबीमधून शपथ घेतली. यावेळी त्यांनी आपला भारतीय राज्यघटनेवर विश्वास असल्याचे सांगितले. तसेच संगरूर मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र संसदेमध्ये आलेल्या मान यांच्याकडील त्यांचं ट्रेडमार्क असलेलं कृपाण गायब होतं. एकेकाळी कृपाण घेऊनच संसदेत येण्यासाठी त्यांचा आग्रह असे.
दरम्यान, तीन वेळा खासदार बनसेल्या मान यांनी १९९९ मध्येही संगरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी आपच्या गुरमेल सिंग यांचा ५ हजार ८०० मतांनी पराभव केला होता. ही जागा भरवंत मान यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती. मात्र तिथे पुन्हा विजय मिळवण्यात आपला अपयश आले. तसेच आपच्या लोकसभेतील खासदारांची संख्या शुन्यावर आली आहे.
सिमरनजित सिंग मान यांनी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेनंतर पोलीस खात्यामधील नोकरी सोडली होती. तसेच १९८९ मध्ये तरनतारन येथून ४.६ लाख मतांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी कृपाण न घेता संसदेत प्रवेश करण्यास त्यांनी नकार दिला होता. १९९९ मध्ये अकाली नेता सुरजित सिंग बर्नाला यांना पराभूत करत त्यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता.