संगरुर:पंजाबमधील संगरुरचे नवनिर्वाचित खासदार आणि शिरोमणी अकाली दल(अमृतसर)चे नेते सिमरनजीत सिंग मान यांच्या एका वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. भारतासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना मान यांनी 'दहशतवादी' म्हटले. मान यांनी भगतसिंग यांच्या एका कृतीचा संदर्भ दिला आणि एका इंग्रज अधिकाऱ्याची हत्या आणि नॅशनल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याच्या घटनेवर भाष्य केले. आम आदमी पार्टीच्या पंजाब युनिटने त्यांचे विधान अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंग मीत हायर यांनी मान यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दल मान यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
सिमरनजीतसिंग मान म्हणाले, "भगतसिंगने एका तरुण ब्रिटिश अधिकाऱ्याची, अमृतधारी शीख हवालदार चन्नन सिंगची हत्या केली होती. नॅशनल असेंब्लीत बॉम्बही फेकला होता. आता तुम्ही मला सांगा की भगतसिंग दहशतवादी होते की भगत होते. लोकांची हत्या करून संसदेत बॉम्ब फेकणे ही लाजिरवाणी बाब नाही का?'' यावेली त्यांना एकाने म्हटले की, ते इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढले. त्यावर मान म्हणाले की, ''ही तुमची विचारसरणी आहे. पण, काहीही असले तरी भगतसिंग दहशतवादी आहेत." सिमरनजीत सिंग मान इथेच थांबले नाहीत. त्यांनी खलिस्तानवरही भाष्य केले. ''सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही खलिस्तानवर बोलू शकता, सभा घेऊ शकता, खलिस्तानबद्दल बोलायला अडचण नाही," असेही ते म्हणाले.
सिमरनजीत सिंग मान यांच्या वक्तव्यावर आम आदमी पक्षाने टीका केली आहे. AAP पंजाबच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगतसिंग या हॅशटॅगसह ट्विट केले आहे, "संगरूरचे खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांना 'दहशतवादी' म्हणणे लज्जास्पद आणि अपमानास्पद आहे. पंजाबचे नागरिक भगतसिंग यांच्या विचारसरणीशी जोडलेले आहेत. आम्ही या बेजबाबदार वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. "