चंदीगड - आम आदमी पक्षाचे नेते (AAP) भगवंत मान (Bhagwant Maan) पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. आज भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांचे गाव खटखड कलां येथे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी मान यांना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मंचावर आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी, मान यांनी त्यांच्या स्टाईलने भाषण केले. तसेच, नवनिर्वाचित आमदारांना काही सूचनाही केल्या.
पंजाब निवडणुकीत 'आप'ने 92 जागा जिंकल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आणि दोन तृतीयांश बहुमताने सत्ता स्थापन केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 117 जागांपैकी 92 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दल तीन जागा आणि भाजपने दोन जागा जिंकल्या, तर बसपने एक जागा जिंकली आणि अपक्षांनीही एक जागा जिंकली.
विनोदी कलाकार ते मुख्यमंत्रीभगवंत मान यांच्या करिअरची सुरुवात कॉमेडियन म्हणून झाली होती. त्यांनी 2008 मध्ये कपिल शर्मासोबत 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता. त्या शोमधून भगवंत मान यांना खूप प्रसिद्धी मिळाली. कॉमेडीसोबतच भगवंत यांना अभिनयातही खूप रस होता. त्यांनी अनेक चित्रपटातही काम केले आहे.