नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान(Bhagwant Maan) यांना जर्मनीत विमानातून खाली उतरवल्याच्या आरोपावरून खळबळ उडाली आहे. भाजप, अकाली दल आणि काँग्रेससह सर्व पक्ष या प्रकरणी आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून स्पष्टीकरण मागत आहेत. यातच आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (jyotiraditya scindia) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.
भगवंत मान प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीशी संबंधित प्रश्नावर ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, "ही घटना जर्मनीमध्ये घडली आहे, त्यामुळे आम्हाला प्रथम तथ्य तपासावे लागेल. मला पाठवलेल्या अपीलांच्या आधारे मी निश्चितपणे यात लक्ष घालेन.'' दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे की, भगवंत मान नुकतेच जर्मनीला गेले होते. ते 17 सप्टेंबरला भारतात परतणार होते. यावेळी लुफ्थांसा एअरलाइन्सने त्यांना जास्त दारू प्यायल्यामुळे विमानातून खाली उतरवले. प्रवाशांच्या हवाल्याने ही माहिती सांगितली जात आहे.
भगवंत मान विरोधकांच्या निशाण्यावर यावरून शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. ही गोष्ट जगभरातील पंजाबींना लाजवणारी आहे.'
काँग्रेसने चौकशीची मागणी केलीविरोधी पक्षनेते प्रतापसिंह बाजवा यांनी या वृत्तांची चौकशी करण्याची मागणी केली. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमोर हा मुद्दा मांडणार असून चौकशीची मागणी करणार असल्याचे बाजवा यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपनेही याप्रकरणी आप सरकारवर निशाणा साधला आहे.
'आप'ने हे वृत्त निराधार असल्याचे सांगितलेआपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दिल्लीला परतले आहेत. हे आरोप निराधार आहेत. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री मान यांनी 18 सप्टेंबर रोजी जर्मनीहून फ्लाइट घेतली होती आणि 19 सप्टेंबरला ते दिल्लीला परतले. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत.