चंडिगड : कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबपोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल बैठकीत ही माहिती दिली. तसेच, पंजाब पोलिसांच्या कल्याणासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या आर्थिक वर्षापासून पोलीस कल्याण निधी 10 कोटींवरून 15 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.
पंजाब पोलीस हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल बनवण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य मनापासून आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच, पोलिसांनी जनतेशी नम्रपणे वागावे असे सांगितले.या बैठकीत मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव ए वेणू प्रसाद, प्रधान सचिव गृह अनुराग वर्मा आणि पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) व्ही.के. भवरा यांचीही उपस्थिती होती.
या बैठकीत सर्व रँकमधील 23 हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुंड, अंमली पदार्थांचे व्यसन, दहशतवाद, बेकायदेशीर खाणकाम आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कोणतीही काळजी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य अत्यंत व्यावसायिकता, समर्पण आणि प्रामाणिकपणे पार पाडावे, असे सांगत राज्यातील पोलिसांच्या कामात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, अशी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ग्वाही दिली.
याचबरोबर, पोलिसांना राज्यातील लोकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आणि कायद्याचे उल्लंघन करणार्यांच्या विरोधात कोणताही पक्षपात न करता कारवाई करण्यास मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, पोलिसांचे काम आव्हानात्मक आणि अतिशय कडक असून चांगली कामगिरी करूनही पोलिसांना जनतेच्या टीकेला सामोरे जावे लागते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही पंजाब पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यंत एकूण 5650 पोलीस कर्मचाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.