Punjab Election Results 2022: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं पहिल्यांदाच सरकार बनणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 'आप'कडून भगवंत मान यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी याआधीच घोषणा झालेली आहे. भगवंत मान यांनी या ऐतिहासिक विजयानंतर सर्वांचे आभार मानले. तसंच जे सोबत येऊ शकले नाहीत त्यांचेही आभार व्यक्त करतो. विरोधकांनी केलेल्या वैयक्तिक टीका आणि टिप्पणीबाबत आज मी सांगू इच्छितो की त्यांनी केलेल्या शब्दावलीसाठी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा, असं भगवंत मान म्हणाले. आम आदमी पक्षानं पंजाबमध्ये ११७ पैकी ८५ हून अधिक जागांवर आघाडी प्राप्त केली आहे.
पंजाबमधील ऐतिहासिक विजयानंतर भगवंत मान यांनी आम्ही जनतेचे सेवक असून जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला निवडून देण्यात आल्याचं म्हणाले. याआधी पंजाबचा कारभार मोठ्या मोठ्या शहरातून चालत होता. पण आता गाव आणि शेतातून कारभाल चालेल, असंही ते म्हणाले. राज्यातील बेरोजगारी सर्वातआधी दूर करण्याचं लक्ष्य असल्याचंही मान यांनी सांगितलं आहे.
२०१४मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केल्यापासूनच भगवंत मान पक्षाचे स्टार प्रचारक राहिले आहेत. संपूर्ण पंजाबमध्ये प्रभाव असलेले २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ते पक्षाचे एकमेव नेते आहेत. आम आदमी पार्टीची सर्वांत मोठी ताकद आणि सर्वात मोठी कमकुवत बाजू म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. जवळपास एका दशकाच्या राजकीय करिअरमध्ये भगवंत मान यांच्यावर दारु पित असल्याचा सर्वांत मोठा आरोप झाला होता. जुलै २०१४ मध्ये खासदारांची एक बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी भगवंत मान माझ्या जवळ बसलेले होते, तेव्हा दारुचा वास येत होता, असं आपचे बंडखोर नेते योगेंद्र यादव यांनी २०१५मध्ये म्हटलं होतं.
माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या आरोपांच्या काही दिवसांनंतर आपचे बंडखोर नेते हरिंदर सिंह खालसा यांनी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे जागा बदलण्याची लेखी विनंती केली होती. भगवंत मान यांच्यामुळे दारुचा वास येत असल्याचं कारण त्यांनी दिलं होतं. पंजाबमध्येही भगवंत मान यांचे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचे व्हीडिओ ते दारुच्या नशेत असल्याचं सांगत व्हायरल झाले आहेत. मात्र, हा कारस्थानाचा भाग असल्याचा दावा मान आणि त्यांच्या समर्थकांकडून वारंवार करण्यात आला आहे. त्यानंतर भगवंत मान यांनी बरनालामध्ये एका सभेमध्ये त्यांच्या आईच्या १ जानेवारी २०१९ पासून दारुला स्पर्श न करण्याची उपस्थित शपथ घेतली होती.
भगतसिंग यांच्या गावात घेणार शपथ-
शहीद भगतसिंग यांची जन्मभूमी असलेल्या खटकरकला गावात भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमध्ये अभूतपूर्व विजयानंतर आप पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या. केजरीवाल यांनी मान यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं.