पंजाबमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यात अँटी गँगस्टर टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली. याचे नेतृत्व एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली केले जाणार असल्याची माहिती पंजाब सरकारने दिली आहे.
मंगळवारी सकाळी भगवंत मान यांनी राज्यातील घडत असलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. "राज्यात अँटी गँगस्टर टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ADG दर्जाचा अधिकारी अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे प्रमुख असतील", असे बैठकीनंतर सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन २० दिवस उलटले आहेत. पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने संपूर्ण बहुमताने राज्यात सरकार स्थापन केले आहे. आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून राज्यातील गुन्हेगारीशी संबंधित घटना अधिक चर्चेत आल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. या गोष्टी लक्षात घेऊन पंजाब सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
पंजाब सरकारने याआधीच पोलिसांना आणखी मजबूत करण्याचा दावा केला आहे. भगवंत मान यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच पोलीस दलात 10 हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. आम आदमी पार्टीला पंजाबमधील त्यांचे काम एक मॉडेल बनवून इतर राज्यांसमोर मांडायचे आहे. आम आदमी पक्षाच्या नजरा या वर्षी होणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकांवर आहेत.