नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या (आप) मोठ्या विजयानंतर आता 16 मार्च रोजी भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी 13 मार्च रोजी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान अमृतसरमध्ये रोड शो करणार आहेत. भगवंत मान सध्या दिल्लीत असून त्यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आप नेते राघव चढ्ढा देखील उपस्थित होते.
पंजाब विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांचा धुरी मतदारसंघातून 58,206 मतांनी विजय झाला आहे. राष्ट्रीय राजधानीला रवाना होण्यापूर्वी संगरूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मान म्हणाले की, पंजाब निवडणुकीत पार्टीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी केजरीवाल यांची भेट घेणार आहे. नवांशहर जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे शपथविधी सोहळा होणार आहे. याचबरोबर, आम आदमी पार्टीच्या दणदणीत विजयाबद्दल भगवंत मान म्हणाले, "जनतेने अहंकारी लोकांना पराभूत केले आणि त्यांनी सर्वसामान्यांना विजयी केले."
राज्यातील विधानसभेच्या 117 पैकी 92 जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे. निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांचा आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडून पराभव झाला आहे. पराभवानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मात्र, राज्यपालांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर कायम राहण्याचे आवाहन केले आहे.
सरकारी कार्यालयात आता मुख्यमंत्र्यांचा फोटो नसणारमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी शहीद भगत सिंग आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले जातील. भगत सिंग यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कार्यालयात मुख्यमंत्र्याऐवजी शहीद भगत सिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले जातील, असे भगवंत मान यांनी निवडणुकीआधी म्हटले होते. त्यानुसार याबाबतचा निर्णय भगवंत मान घेणार का? हे पाहावे लागणार आहे.