भागवतांना सत्य माहित्येय, पण...; चीनबद्दलच्या विधानावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

By कुणाल गवाणकर | Published: October 25, 2020 03:30 PM2020-10-25T15:30:02+5:302020-10-25T15:33:23+5:30

मोहन भागवतांच्या विधानावर राहुल गांधींची सडकून टीका

Bhagwat Knows The Truth But Scared To Face It says congress leader rahul gandhi | भागवतांना सत्य माहित्येय, पण...; चीनबद्दलच्या विधानावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

भागवतांना सत्य माहित्येय, पण...; चीनबद्दलच्या विधानावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

Next

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या चीनबद्दलच्या विधानाचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी समाचार घेतला आहे. मोहन भागवत यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण त्यांना या गोष्टीचा सामना करण्याची भीती वाटते. चीननं आपल्या जमिनीवर कब्जा केला हे सत्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

विजयादशमीच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित करताना चीनवर भाष्य केलं. चीननं भारतीय हद्दीत कशाप्रकारे घुसखोरी केली आणि आजही त्यांच्याकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत, हे आता जगाला स्पष्टपणे समजलं आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेची सगळ्यांना कल्पना आहे. चीन एकाच वेळी तैवान, व्हिएतनाम, अमेरिका, जपानसह अनेक देशांशी लढत आहे. मात्र भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरानं चीनला धक्का बसला आहे, असं भागवत यांनी म्हटलं आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर राहुल गांधींनी शरसंधान साधलं. 'भागवत यांना सत्य माहिती आहे. मात्र ते सत्याचा सामना करण्यास घाबरतात. चीननं भारताची जमीन बळकावली हे सत्य आहे. भारत सरकार आणि आरएसएसनं याला परवानगी दिली आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



काय म्हणाले होते मोहन भागवत?
कोरोनाच्या महामारीसंदर्भात चीनची भूमिका संशयास्पद राहिली हे तर म्हटलेच जाऊ शकते, मात्र स्वतःच्या आर्थिक, सामरिक बळामुळे उन्मत्त होऊन भारताच्या सीमांवर ज्या पद्धतीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तो संपूर्ण जगासमोर स्पष्ट झाला आहे. भारताचे शासन, प्रशासन, सैन्य तसेच जनतेने या आक्रमणासमोर उभे राहून आपला स्वाभिमान, दृढनिश्चय व शौर्याचा उज्वल परिचय दिला आहे. यामुळे चीनला अनपेक्षित धक्का मिळाल्याचे वाटत आहे. या परिस्थितीत आपल्याला सावध होऊन दृढ व्हावे लागेल. चीनने याअगोदरदेखील वेळोवेळी जगाला आपल्या विस्तारवादी मनोवृत्तीची ओळख दिली आहे. आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, आपली अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रणाचा एकमेव उपाय आहे. या दिशेने आपल्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांची पावलेदेखील पडत आहेत, असे दिसून येते. श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ हे आपले शेजारी देश, जे आपले मित्रदेखील आहेत व मोठ्या प्रमाणात समान प्रकृतीचे देश आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला आणखी मित्रत्वाचे संबंध करण्याबाबत वेग वाढविला पाहिजे. या कार्यात अडथळे उत्पन करणारे मतभेत, मतांतरे, वाद इत्यादी मुद्दे त्वरित दूर करण्याचे आणखी प्रयत्न करावे लागतील, अशी अपेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली.

Web Title: Bhagwat Knows The Truth But Scared To Face It says congress leader rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.