नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या चीनबद्दलच्या विधानाचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी समाचार घेतला आहे. मोहन भागवत यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण त्यांना या गोष्टीचा सामना करण्याची भीती वाटते. चीननं आपल्या जमिनीवर कब्जा केला हे सत्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले. विजयादशमीच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित करताना चीनवर भाष्य केलं. चीननं भारतीय हद्दीत कशाप्रकारे घुसखोरी केली आणि आजही त्यांच्याकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत, हे आता जगाला स्पष्टपणे समजलं आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेची सगळ्यांना कल्पना आहे. चीन एकाच वेळी तैवान, व्हिएतनाम, अमेरिका, जपानसह अनेक देशांशी लढत आहे. मात्र भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरानं चीनला धक्का बसला आहे, असं भागवत यांनी म्हटलं आहे.सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर राहुल गांधींनी शरसंधान साधलं. 'भागवत यांना सत्य माहिती आहे. मात्र ते सत्याचा सामना करण्यास घाबरतात. चीननं भारताची जमीन बळकावली हे सत्य आहे. भारत सरकार आणि आरएसएसनं याला परवानगी दिली आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भागवतांना सत्य माहित्येय, पण...; चीनबद्दलच्या विधानावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
By कुणाल गवाणकर | Published: October 25, 2020 3:30 PM