नवी दिल्ली- भय्यूजी महाराज देशभरात तसे फारसं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व नसलं तरी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात त्यांचा नावलौकिक आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषण सोडावं, यासाठीही भय्युजी महाराजांनी ब-याचदा सक्रियरीत्या मध्यस्थी केली होती. भय्यूजी महाराज यांचं खरं नाव उदय सिंह देशमुख आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांना लोक भय्यूजी महाराज नावानं ओळखतात. या दोन राज्यांत त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत.अण्णाही त्यांच्या सामाजिक कार्यानं प्रभावित झाले होते. भय्यूजी महाराज हे नशिबानं बनलेले संत आहेत. भय्यूजींचा एका शेतक-याच्या घरी जन्म झाला होता. वडिलांबरोबर सुरुवातीला ते शेतीही करायचे. घोडेस्वारी आणि तलवारबाजीत त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं होतं. त्यांनी ब-याच कविताही केल्या आहेत. तरुण वयात त्यांनी सियाराम शूटिंग शर्टिंगच्या पोस्टरसाठी मॉडेलिंगही केलं होतं. विशेष म्हणजे त्यांना एखाद्याची चेहरापट्टीही वाचता येते. त्यांना कुहू नावाची एक मुलगी आहे.29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. त्यांना भगवान दत्ताचा आशीर्वाद लाभल्याचीही लोकांमध्ये चर्चा होती. महाराष्ट्रात त्यांना राष्ट्र संताचा दर्जा बहाल करण्यात आला होता. ते सूर्याची उपासना करायचे. तसेच त्यांनी पाण्यातही साधना केली होती. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे ते जवळचे समजले जायचे. भाजपा नेते नितीन गडकरी ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. भय्यूजी महाराज पद, पुरस्कार, शिष्य आणि मठाचे विरोधी होते.व्यक्तिपूजेचा ते नेहमीच द्वेष करत आले आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात शिक्षा, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातल्या देहविक्रय करणा-या 51 मुलांना त्यांनी स्वतःचं नाव दिलं होतं. बुलडाण्यातल्या खामगाव जिल्ह्यात आदिवासीच्या 700 मुलांसाठी त्यांनी शाळा बनवली होती. या शाळेच्या स्थापनेआधी त्यांनी पार्धी जमातीच्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली होती.परंतु त्यांनी हिंमत हारली नाही. तसेच त्यांनी त्या पार्धी जमातीचा विश्वासही जिंकला. त्यांची महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात अनेक आश्रमं आहेत. भय्यूजी महाराज हे ग्लोबल वॉर्मिंगनंही चिंतीत होते. त्यामुळे गुरुदक्षिणेच्या नावाखाली ते झाडे लावण्याचा सल्ला द्यायचे. आतापर्यंत त्यांनी 18 लाख झाडे लावली आहेत. देवास आणि धार या आदिवासी जिल्ह्यांत त्यांनी जवळपास 1 हजार तलाव खोदले होते. ते नारळ, शॉल आणि फूलमाला स्वीकारत नव्हते. तसेच शिष्यांनाही त्यांनी फूलमाळा आणि नारळावर पैसे बरबाद न करण्याचा सल्ला दिला होता. त्यांची ट्रस्टनं जवळपास 10 हजार मुलांना आतापर्यंत स्कॉलशिप दिली आहे
Bhaiyyuji Maharaj Life Journey: भय्यूजी महाराजांचा मॉडेलिंग ते संतपदापर्यंतचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 3:36 PM