इंदूर : आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भय्यूजी महाराजा यांची कन्या कुहू हिने पार्थिवाला मुखाग्नि दिला. काल (दि.12) भय्यूजी महाराज यांनी राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.
सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुर्योदय आश्रमात भय्यूजी महाराज यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी दीड वाजता सूर्योदय आश्रमातून मेघदूत मुक्तीधाम स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी आश्रम परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच, हजारो अनुयायी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.
भय्यूजी महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. यामध्ये जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक तसेच करमणूक क्षेत्रातील मंडळींचा भय्यूजी महाराजांशी संबंध होता. त्यांचा सल्ला व आशीर्वाद घेण्यासाठी या क्षेत्रातील मंडळी नेहमी त्यांच्याकडे जात. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अध्यात्म व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेतली होती.