राजस्थानला नवे मुख्यमंत्री मिळाले असून मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांचा सस्पेंस संपवला आहे. दोन्ही राज्यांमध्ये हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे आणले आणि आता राजस्थानमध्येही तेच दिसून आलं.
मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव (MP CM Mohan Yadav) यांना मुख्यमंत्री म्हणून निवडलं आहे, तर छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय (Chattisgarh CM Vishnu Dev Sai) यांच्याकडे या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड प्रमाणेच राजस्थानचे भावी मुख्यमंत्रीही कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा यांनी सांगानेरमधून निवडणूक जिंकली आहे.
भजनलाल शर्मा हे करोडपती आहेत आणि त्याची एकूण संपत्ती 1.40 कोटी रुपये आहे, तर 35 लाखांचं कर्ज आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संपत्तीच्या तपशिलाशी संबंधित प्रतिज्ञापत्रानुसार, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या एकूण संपत्तीपैकी 1,15,000 रुपये रोख आहेत, तर विविध बँकांमधील खात्यामध्ये जवळपास 11 लाख रुपये आहेत.
शर्मा यांच्याकडे तीन तोळं सोनं आहे, ज्याची किंमत 1,80,000 रुपये आहे. त्यांनी शेअर्स किंवा बाँड्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, परंतु त्यांच्याकडे LIC आणि HDFC Life च्या दोन विमा पॉलिसी आहेत, ज्यांची किंमत 2,83,817 रुपये आहे. याशिवाय वाहनांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या नावावर टाटा सफारी आहे, ज्याची किंमत पाच लाख रुपये प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे, याशिवाय एक टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल असून ज्याची किंमत 35,000 रुपये आहे.