कोलाकाता : केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. कामगार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी जवळपास 20 कोटी कर्मचाऱ्यांनी या देशव्यापी संपात सहभाग घेतला होता. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे महासचिव अमरजीत कौर यांनी दिल्लीतील 10 सेंट्रल ट्रेड युनियनच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आजही कामगार संघटनांचा संप सुरुच आहे. काल कामगार संघटनांच्या आंदोलनाला पश्चिम बंगालमधील २४ परगाना जिल्ह्यात हिंसक वळण आले. यावेळी आंदोलकांनी बस फोडल्या आणि जाळपोळ केली. तर, आंदोलकांनी आजही सरकारी बसेसवर दगडफेक केली आहे. त्यामुळे बस चालक हेल्मेट घालून ड्रायव्हिंग करत आहेत. तसेच, येथील सीपीएमचे नेते सुजन चक्रर्वती आणि आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्यातील रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांसह पोस्ट, बीएसएनएल कर्मचा-यांनी उडी घेतली आहे. याशिवाय या संपात विमा कंपन्या, संरक्षण उत्पादन कारखाने, केंद्र-राज्य सरकारी कार्यालये, वीज मंडळ, आरोग्य विभाग, अंगणवाडी, आशा कर्मचारी, कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, बांधकाम मजूर आदींचा सहभाग असल्याने देशभरातील कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे समजते.