नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. या भारत बंदमध्ये शेतकऱ्यांची अनेक महामार्ग जाम केले आहेत, तसेच रेल रोकोही करण्यात येत आहे. सोमवारी आठवड्याच्या आणि कामाच्या पहिल्या दिवशीच दिल्ली-गुरुग्राम सीमेवर प्रचंड जाम झालेला पाहायला मिळत आहे. हायवेवर शेकडो गाड्यांची लांबच-लाब रांग दिसत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सकाळपासून हा मार्ग बंद केला आहे. तर, तिकडे गाझीपूर सीमेवरही शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे बंद केला आहे. याच दरम्यान शेतकरी आंदोलनात हरियाणाच्या सिंघु सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर येत आहे.
'भारत बंद' दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर यासंबंधात अधिक माहिती देता येईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो. परंतु, यासाठी कोणत्याही बाजुने कोणत्याही अटी-शर्ती लावल्या जाऊ नयेत. मोकळ्या मनाने चर्चा करून या प्रश्नांवर उत्तर काढण्याचा प्रयत्न करायला हवा, असं म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गही बंद
भारत बंदमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्रातील शहाबाद परिसरातही आंदोलक शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकर्यांनी रस्त्याच्या मधोमध गाद्या टाकून त्यावर झोपून रस्ता अडवल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे या मार्गावर ट्रकच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, गाझियाबाद आणि नोएडा पोलिसांनी आधीच वाहतूक वळवण्याचा मार्ग जारी केला आहे.
"आम्ही पुढचे 10 वर्षे आंदोलन करण्यास तयार"
आम्ही पुढील दहा वर्षेही आंदोलन करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रियी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. टिकैत पुढे म्हणाले की, केंद्रीय कृषी मंत्री चर्चेसाठी येण्याचे आमंत्रण देत आहे. पण, आम्हाला कृषीमंत्र्यांना विचारायचे आहे की, सरकारने आम्हाला वेळ आणि ठिकाण सांगावं. पण, केंद्र सरकार तसं करणार नाहीत. ते फक्त बोलतात पण करत काहीच नाहीत. सरकारने आम्हाला बिनशर्त चर्चेसाठी बोलवावे. 10 वर्षे लागली तरी आम्ही तयार आहोत, पण आम्ही आमच्या मागण्या मागे घेणार नाहीत. तसेच, बंद दरम्यान रुग्णवाहिका, डॉक्टर आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित इतर लोकांना थांबवले जाणार नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.