नवी दिल्ली - शेतकऱ्यांची आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. भारतीय किसान युनियनने आज पुकारलेल्या भारत बंदचा उत्तर प्रदेशमध्ये फारसा परिणाम दिसून येत नाही. गाझियाबाद वगळता इतर सर्व शहरांमध्ये जनजीवन सामान्य आहे. दरम्यान, या बंदच्या निषेधार्थ भारतीय किसान युनियनच्या भानु गटाने राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि भारत बंद करणाऱ्या शेतकरी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय किसान युनियन भानु गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह (Bhanu Pratap Singh) यांनी राकेश टिकैत यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदवर निशाणा साधत हा तालिबानी बंद असल्याचं म्हटलं आहे.
"शेतकरी नेत्यांच्या या भारत बंदचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. भारत बंद करून राकेश टिकैत यांना दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन द्यायचे आहे का? तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानवर कब्जा केला. राकेश टिकैत यांनाही भारतात अशाच प्रकारच्या कारवाया वाढवायच्या आहेत. त्यांचा हेतू योग्य वाटत नाही" असा गंभीर आरोप अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी केला आहे. तसेच "राकेश टिकैत स्वतःला शेतकरी नेता म्हणवतात आणि नंतर भारत बंदची घोषणा करतात. मात्र, यामुळे अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांवर परिणाम होतो. याचा कोणाला फायदा होईल? अशा प्रकारचे आंदोलनं सुरू ठेवून ते तालिबानच्या पावलावर पाऊल टाकत आहेत" असंही म्हटलं आहे.
"कोणीही भारत बंदमध्ये सहभागी होऊ नये"
भानु प्रताप सिंह यांनी "कोणीही भारत बंदमध्ये सहभागी होऊ नये आणि त्याला समर्थन देऊ नये. दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या अशा संघटनांना दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे" अशी मागणी केली आहे. तसेच भानु प्रताप सिंह यांनी याआधी देखील काही दिवसांपूर्वी राकेश टिकैत यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचे जे नेतृत्व करत आहेत ते राकेश टिकैत ठग आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस सरकारकडून निधी पुरवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'हे राजकीय आंदोलन नाही'; भारत बंदमध्ये काँग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता
भारत बंदचं समर्थन करण्यासाठी काँग्रेस नेते पोहोचले होते पण शेतकऱ्यांनी विरोध करून त्यांना घरी पाठवल्याची घटना आता समोर आली आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी (Congress Anil Chaudhary) शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर पोहचले. मात्र आंदोलकांनी मात्र राजकीय आंदोलन नसल्याचं सांगत अनिल चौधरी यांना घरचा रस्ता दाखवला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते प्रविण मलिक यांनी "भारत बंदला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही राजकीय नेत्यांचे आभार मानतो. परंतु, आमच्या प्रश्नांचा आणि मंचाचा राजकारणाशी संबंध नाही. आम्ही राजकीय पक्षांना आमच्या मंचावर परवानगी देणार नसल्याचं आम्ही आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांना शेतकरी आंदोलन स्थळापासून थोड्या अंतरावर आपलं आंदोलन करण्याची विनंती केली" असं म्हटलं आहे.