Bharat Bandh: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर मोदी मूग गिळून गप्प- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 12:06 PM2018-09-10T12:06:18+5:302018-09-10T12:08:55+5:30
इंधन दरवाढीविरोधात विरोधकांचं धरणे आंदोलन
नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या दरांवर नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. इंधन दरवाढ, महिलांवरील बलात्कार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी याबद्दल मोदी काहीच बोलत नाही. 2014 मध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. मात्र भाजपा सरकारनं गेल्या 4 वर्षांमध्ये काय केलं, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला.
Narendra Modi ji is silent, he has not spoken a word on rising prices of fuel, or condition of farmers, neither on atrocities against women: Rahul Gandhi during #BharathBandh protests in Delhi pic.twitter.com/wURfFTXT1i
— ANI (@ANI) September 10, 2018
सध्या देशातील कोणालाही योग्य दिशा सापडत नाही. फक्त मोदींच्या उद्योगपती मित्रांना योग्य दिशा सापडली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर उद्योगपतीधार्जिणे असल्याचा आरोप केला. 'तरुणांकडे रोजगार नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत. सर्वसामान्य जनता महागाईमुळे गॅसवर आहे. चार वर्षांपूर्वी 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 800 रुपयांचा झाला आहे. मात्र तरीही मोदी मूग गिळून गप्प आहेत. आज देशातील काही मोजक्याच लोकांना योग्य दिशा सापडली आहे. मोदींच्या उद्योगपती मित्रांचं सर्वकाही उत्तम सुरू आहे,' असं राहुल गांधी म्हणाले.
Aaj poora vipaksh yahan ek saath baitha hai. Hum sab mil kar ek saath, BJP ko hatane ka kaam karenge: Rahul Gandhi during #BharathBandh protests in Delhi pic.twitter.com/CIbjNtcAs9
— ANI (@ANI) September 10, 2018
मोदी सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करतं. मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, असा घणाघात राहुल यांनी केला. 'मोदी केवळ मोजक्या व्यक्तींसाठी काम करतात. त्यांच्या मर्जीतील उद्योगपतींना कर्जमाफी मिळते. मात्र कर्जमाफीसाठी वापरला जाणारा हा पैसा मोदींचा किंवा त्या उद्योगपतींचा नाही. तो या देशातील सर्वसामान्य जनतेचा आहे. मोदी सरकार तुमच्या खिशातून पैसा चोरत आहे,' अशी टीका राहुल यांनी केली. यावेळी मंचावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.