पाटणा: शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील जातीवर आधारित आरक्षणाविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण आले आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला असून अनेक भागांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर, काही ठिकाणी हिंसक झालेल्या जनसमुदायाने जाळपोळदेखील केली आहे. बिहार येथील आरानगरमधील आनंदनगर परिसरात भारत बंदचे समर्थन आणि विरोध करणा-यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. तसेच, आरानगरमध्ये काही तरुणांनी पटना पॅसेंजर रेल्वे रोखून धरली. यावेळी तरुणांनी आरक्षणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, या आंदोलनादरम्यान सात जण जखमी झाले आहेत. काही आंदोलकांना पोलिसांनी अटक केली असून आरा परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. या शिवाय गयामध्ये आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आरक्षणाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांनी बिहारच्या भोजपूरमध्ये रस्ता रोखला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जाळपोळदेखील झाली आहे. कैमूर जिल्ह्यातील नॅशनल हायवे २१९ वर आंदोलक तरुणांनी आरक्षणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन हायवे रोखला आहे. मुझफ्फरपूरमध्येही पाटणा हायवे रोखण्यात आला आहे.
Bharat Bandh: बिहामधील गयामध्ये लाठीचार्ज, आरामध्ये गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 4:20 PM