मुंबई - बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात भारत बंदची आज हाक दिली आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरून नागरिकांनी सीएए व एनआरसीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. डीएनए आधारित एनआरसी करा, सीएए हटवा, ईव्हीएम बंद करा व देश वाचवा या प्रमुख मागण्या भारत बंद आंदोलनात करण्यात आल्या आहेत.
बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. बंद यशस्वी व्हावा यासाठी मुंबईमध्ये काही आंदोलक हे रेल रोको करण्यासाठी ट्रॅकवर उतरले होते. कांजूरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाने रेल रोको केला. या रेल रोकोचा फटका मध्य रेल्वेला बसला असून वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू असून यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ट्रॅकवरुन हटवलं असून ताब्यात घेतलं आहे. यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
लाईव्ह अपडेट
- औरंगाबाद : बंद दरम्यान एस टी बस अडविणाऱ्या जमावाची पोलिसांना मारहाण, व्हिडीओ कॅमेरा फोडला.
- संग्रामपूर : भारत बंद दरम्यान सोनाळा येथे किरकोळ वाद, एक जण जखमी
- शेगाव : बहुजन क्रांती मोर्चा व मुस्लिम संघटनाच्या भारत बंदला शेगावात गालबोट लागले.
- यवतमाळ : बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान यवतमाळातील मारवाडी चौकात गालबोट लागले.
- कुर्ला येथे भारत बंदला संमिश्र प्रतिसाद.
- सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याला विरोध दर्शविणारे फलक दुकानाबाहेर लावून चेंबूरमधील व्यापाऱ्यांचा भारत बंदमध्ये सहभाग
- अकोला : काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- पातुरात आंदोलनाला हिंसक वळण. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
- भारत बंद दरम्यान जळगावात दुकानावर दगडफेक, दुकानाचे नुकसान
- भारत बंद : पालघर जिल्ह्यातील जव्हार बंद आहे.
- बहुजन क्रांती मोर्चा च्या भारत बंद विरोधात जबरदस्तीने दुकाने बंद करून रस्ता रोको करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. पोलिसांचा मोठा लाठीचार्ज.
- भारत बंद : मुंब्रा बंद आहे.
- धुळे : भारत बंद दरम्यान शिरपुरला बसवर दगडफेक, एक जण किरकोळ जखमी झाला. धुळ्यात साक्री रोडवर टायर जाळले
- जळगाव : शामा फायर व्यापारी संकुलात फोटो स्टुडिओ फोडण्याचा प्रयत्न.
- जळगाव : जळगावात बंदचा परिणाम नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू.
- विजापूर वेस बंद, लक्ष्मी मार्केट बंद, जिल्हा परिषद परिसरातील दुकाने बंद
- सोलापूर : बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज भारत बंद; सोलापुरात संमिश्र प्रतिसाद
- अकोला : सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ आयोजित ‘भारत बंद’ दरम्यान पातूर येथे रास्ता रोको आंदोलन.
- मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने, कांजूरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाचा रेल रोको
- बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक