नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दर्शवलेला नाही. राजधानी नवी दिल्लीमधील रामलीला मैदानावर काँग्रेससह विरोधी पक्षनेते एकवटले आहेत. सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार निदर्शनं सुरू आहेत. यावेळेस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला.
'देशहितार्थ नसलेल्या अनेक गोष्टी मोदी सरकारनं केल्या आहेत. मोदी सरकार सर्वच बाबतींमध्ये अपयशी ठरले आहे, त्यामुळे आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे', असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
(Bharat Bandh: ...अन् राहुल गांधींनी वापरला मोदींचा 'तो' डायलॉग)
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या दरांवर नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीपंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. इंधन दरवाढ, महिलांवरील बलात्कार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी याबद्दल मोदी काहीच बोलत नाही. 2014 मध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. मात्र भाजपा सरकारनं गेल्या 4 वर्षांमध्ये काय केलं, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला.
सध्या देशातील कोणालाही योग्य दिशा सापडत नाही. फक्त मोदींच्या उद्योगपती मित्रांना योग्य दिशा सापडली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर उद्योगपतीधार्जिणे असल्याचा आरोप केला. 'तरुणांकडे रोजगार नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत. सर्वसामान्य जनता महागाईमुळे गॅसवर आहे. चार वर्षांपूर्वी 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 800 रुपयांचा झाला आहे. मात्र तरीही मोदी मूग गिळून गप्प आहेत. आज देशातील काही मोजक्याच लोकांना योग्य दिशा सापडली आहे. मोदींच्या उद्योगपती मित्रांचं सर्वकाही उत्तम सुरू आहे,' असं राहुल गांधी म्हणाले.
मोदी सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करतं. मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, असा घणाघात राहुल यांनी केला.
शरद पवार यांची बोचरी टीका
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला. ''सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने जी पावलं उचलायला हवी होती, ती उचलली नाहीत. त्यामुळे सामान्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत'', असे शरद पवार यांनी सांगितले.
''देशाची अर्थव्यवस्था संकटात आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. याशिवाय, गॅसच्या किंमतीत वाढ करणे, पेट्रोल-डिझेलचे दर वाढवणे ही मोदी सरकारची बहादुरी आहे'', अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली.