नवी दिल्ली : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या या बंद आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीमधील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहित विरोधी पक्षनेते एकवटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार सुद्धा याठिकाणी उपस्थित आहेत.
यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने जी पावलं उचलायला हवी होती, ती उचलली नाहीत. त्यामुळे सामान्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था संकटात आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. याशिवाय, गॅसच्या किंमतीत वाढ करणे, पेट्रोल-डिझेलची महागाई वाढविणे ही मोदी सरकारची बहादुरी आहे, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली.
यापुढे ते म्हणाले, चाळीस पंचेचाळीस वर्षात काहीच झाले नाही, असे या सरकारकडून म्हटले जाते. मात्र, विरोधात असताना वाजपेयींनी त्यांचे डोळे उघडले होते. चाळीस पंचेचाळीस वर्षांत काही झाले नाही असे म्हणणे म्हणजे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचाच अपमान आहे, असे वाजपेयी एकदा म्हणाले होते, अशी आठवण शरद पवार यांनी करुन दिली.
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर मोदी मूग गिळून गप्प- राहुल गांधी
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या दरांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. इंधन दरवाढ, महिलांवरील बलात्कार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी याबद्दल नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. 2014 मध्ये जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. मात्र भाजपा सरकारने गेल्या 4 वर्षांमध्ये काय केले, असा प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.
(Bharat Bandh Live Updates: 'भारत बंद'ला सुरुवात; देशभरात काँग्रेसची निदर्शनं)