नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी समर्थन दिले आहे.
राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. "मोदी-शाह यांच्या सरकारद्वारे लागू केलेल्या जनविरोधी, कामगारविरोधी धोरणांनी देशात बेरोजगाराची स्थिती तयार केली आहे. तसेच, यासोबत PSU ला कमकुवत केले जात आहे. यामुळे देशातील 25 कोटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. तर मी त्या सर्व कर्मचाऱ्यांना सलाम करतो.", असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसह राज्यातील चार कोटी कामगार सहभागी होणार आहेत. मात्र रेल्वे व अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे, अशी माहिती कामगार कृती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली आहे.
याचबरोबर, या संपात केंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक बँका, विमा, पोर्ट ट्रस्ट, संरक्षण, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएसएनएल, एमटीएनएल, पालिका, महापालिका कर्मचारी तसेच टॅक्सी, रिक्षा, मालवाहतूकदार, अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरकामगार, माथाडी, बांधकाम कामगार सहभागी होणार आहेत. सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती या शिक्षकांच्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली आहे.