नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. या भारत बंदला राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. यावर, राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.
तीन कृषी कायदे लागू झाल्यानंतरही बाजार समित्या आणि एमएसपी कायमच राहतील. तिन्ही कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी चुकीची आहे, असे म्हणत मोदी सरकारमध्ये शेतकरी आनंदी होत आहेत, असा दावा रविशंकर प्रसाद यांनी News18 India सोबत बोलताना केला आहे. तसेच, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. शेतकर्यांचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी सरकार समर्पित आहे. बाजारपेठ शेतकर्यांसाठी संपणार नाही किंवा एमएसपीही संपणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कुणी ताब्यात घेणार नाहीत. हे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
अनेक दिवसांपासून चर्चा होत असतानाही शेतकरी अद्याप आपल्या मागण्यावर ठाम आहेत. यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, "आमचे वरिष्ठ मंत्री बोलत आहेत आणि चर्चा चालू आहे. यावर मी भाष्य करणार नाही. नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकर्यांना आणि त्यांच्या विकासाला समर्पित आहे. आमच्या सरकारने किसान सम्मान निधीच्या माध्यमातून 10 कोटी शेतकऱ्यांना 1 लाख कोटी रुपये दिले आहेत." याचबरोबर, आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठीअनेक योजना आणल्या आहेत. एमएसपीवर सुरू झालेल्या चर्चा कायदा रद्द करण्यापर्यंत कशी पोहोचली? यामागील कोणती शक्ती हा मोठा प्रश्न आहे. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत 60,000 कोटी रुपयांचे धान एमएसपीवर खरेदी करण्यात आले आहे. एमएसपी देखील वाढविण्यात येत आहे, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले आहेत.