नवी दिल्ली : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी आज पुकारलेल्या 'भारत बंद'ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांसह इतर राज्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. हरयाणामधील यमुनानगर येथे आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. याशिवाय देशातील मध्यप्रदेश, मेरठ, पंजाब, हिसार, फिरोजपूर अशा ठिकाणी दलितांनी काढलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको करण्यात आला, तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. ग्वालियार आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात बंद दरम्यान आतापर्यंत देशभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घूसून ऑफिसची तोडफोड केली आहे. या तोडफोडी दरम्यान रेल्वेचे कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच, या आंदोलनामुळे जम्मू-तवी एक्स्प्रेस स्थानकावर थांबविण्यात आल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, या प्रवाशांच्या मदतीसाठी येथील सामाजिक संघटना धावल्या असून त्यांनी प्रवाशांना पाणी आणि जेवणाची सोय केली आहे.