नवी दिल्ली: कोवॅक्सिन लसीचं उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकनं प्रेसिसा मेडिकामेंटोस आणि एनविक्सिया फार्मास्युटिकल्स या दोन कंपन्यांसोबतचा करार रद्द केला आहे. ब्राझीलमध्ये कोवॅक्सिन विकण्यासाठी भारत बायोटेकनं या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले होते. मात्र आता दोन्ही कंपन्यांसोबतचे करार रद्द करण्यात आले आहेत. ब्राझीलची राष्ट्रीय आरोग्य एजन्सी अन्विसासोबत काम सुरू ठेवू आणि लसीसाठी आवश्यक असलेली मंजुरी प्रक्रिया पूर्ण करू, असं भारत बायोटेकनं सांगितलं आहे.
भारत बायोटेककडून ब्राझीलला कोरोना लसीचे दोन कोटी डोस दिले जाणार होते. त्यासाठी ब्राझील सरकारसोबत करारदेखील झाला. मात्र हा करार वादग्रस्त ठरला. करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप झाल्यानं ब्राझील सरकारनं करार रद्द केला. याबद्दलची घोषणा ब्राझीलच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली. भारत बायोटेकसोबतचा लस पुरवठ्याचा करार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा २९ जूनला करण्यात आली.
भारत बायोटेकसोबतचा करार रद्द करण्यात आल्यानंतर देशातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची गती मंदावणार नाही, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं होतं. याबद्दल भारत बायोटेकनंदेखील स्पष्टीकरण दिलं होतं. '२९ जून २०२१ पर्यंत भारत बायोटेकला कोणताही आगाऊ रक्कम मिळालेली नाही. याशिवाय कंपनीनं ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाला लसींचा पुरवठादेखील केलेला नाही. कंपनी सर्व नियमांचं पालन करते. जगातील अनेक देशांत लस पुरवत असताना नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे', असं भारत बायोटेकनं म्हटलं आहे.