Bharat Biotech gets DCGI approval for emergency use of Covaxin for kids : भारत बायोटेकला १२ ते १८ या वयोगटातील लहान मुलांना कोवॅक्सिन लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने २५ डिसेंबरला यास परवानगी दिल्याची माहिती एएनआयने अधिकृत सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. कोव्हॅक्सिन ही भारतातील मुलांसाठी वापरण्यासाठी मंजूर झालेली दुसरी कोविड-19 लस आहे. तसेच, CoWin प्लॅटफॉर्मवर मुलांची नोंदणी करण्यासाठी नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात येत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशात कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन हातपाय पसरत असताना लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यात यावा आणि त्यासाठी लसींना परवानगी देण्यात यावी अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात होती. त्यामुळे अखेर DGCI ने आपातकालीन परिस्थितीत १२ ते १८ या वयोगटातील मुलांना कोवॅक्सिनचा डोस देण्यास मान्यता दिली आहे. असे असले तरी कोवॅक्सिन लहान मुलांना नक्की कधीपासून देता येईल याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. पण याबद्दलही लवकरच निर्णय घेतला जाईल आणि कोवॅक्सिनचे लहान मुलांना लवकरच लसीकरण सुरू केले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये लहान मुलांसाठी लसीकरणास खूप आधीच सुरूवात झाली आहे. अमेरिका, ब्रिटन यासारख्या प्रगत देशांनी आधीच लहान मुलांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार त्यांचे लसीकरण केले जात आहे. पण भारतात मात्र मोठ्यांना पहिले लसीकरणाचे दोन डोस देण्यावर भर देण्यात आला होता. भारत सरकारच्या वैद्यकीय विगाभाकडून लहान मुलांच्या लसीकरणावर फारसा जोर दिला जात नव्हता. पण आता DGCI ने Covaxin च्या वापराला परवानगी दिली असल्याने लहान मुलांच्या लसीकरणाला जोर मिळेल असे दिसत आहे.