नवी दिल्ली – भारतात कोरोनाविरूद्ध दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता त्यावरून राजकारण रंगलं आहे. याचवेळी हैदराबादच्या भारत बायोटेकचे सीएमडी कृष्णा इल्ला यांनी खंत व्यक्त केली आहे. काही कंपन्यांनी कोव्हॅक्सिनला पाणी संबोधल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत आमच्या कोरोना लस चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, काही लोकांच्या माध्यमातून लसीवर राजकारण सुरू आहे, तसं होऊ नये असं आवाहन इल्ला यांनी केलं.
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांचे नाव न घेता कृष्णा इल्ला म्हणाले की, आम्ही २०० टक्के प्रामाणिकपणे क्लिनिकल निरीक्षण करतो तरीही आम्हाला टीकेचे धनी बनवलं जात आहे. जर मी चुकलो असेल तर ते मला सांगा, काही कंपन्या आमच्या लसीला पाणी असल्यासारखं बोलत आहेत. ते मी स्पष्टपणे नाकारतो, आम्ही संशोधक आहोत, आमच्या चाचणीवर कोणीही प्रश्न उपस्थित करू नये असं त्यांनी सांगितले.
अदार पूनावाला काय म्हणाले होते?
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी रविवारी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, कोरोनाविरूद्ध केवळ तीन लस प्रभावी आहेत, फायझर, मोडर्ना आणि ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका आणि बाकी फक्त पाण्यासारख्या सुरक्षित आहेत.
ऑक्सफोर्ड लसीच्या डेटावर कोणीही प्रश्न उचलले नाहीत - इल्ला
कृष्णा इल्ला यांनी सांगितले की, अमेरिका आणि यूरोपने यूकेच्या एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्ड लसीच्या परीक्षण डेटाला मंजुरी देण्यात नकार दिला, कारण तो डेटा स्पष्ट नव्हता, परंतु कोणीही ऑक्सफोर्ड लसीच्या डेटावर प्रश्न उपस्थित करत नाही.
सुरक्षित आणि प्रभावी लसीचं उत्पादन करणं हा आमचा रेकॉर्ड
कृष्णा इल्ला म्हणाले की, आमच्या कंपनीचा सुरक्षित आणि प्रभावी लस उत्पादन करण्याचा रेकॉर्ड राहिला आहे. लसीच्या चाचणीचा सर्व डेटा पारदर्शक आहे. लसीच्या सर्व डेटाचं पहिल्यापासून खुलासा केला आहे. हा डेटा लोकांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहे. ही लस केवळ भारतीय आहे म्हणून त्यावर निशाणा साधला जात असल्याचा आरोप कृष्णा इल्ला यांनी केला आहे. कोव्हॅक्सिनच्या मंजुरीवर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि काँग्रेसचे काही नेते प्रश्न उपस्थित करत आहेत आणि तिसऱ्या टप्प्यातील निरीक्षण अहवाल उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
भारत बायोटेकचा डेटा पारदर्शक, 70 हून अधिक लेख प्रकाशित
इल्ला म्हणाले की, भारत बायोटेकचा डेटा पारदर्शक नाही असं म्हणणं चुकीचं आहे. इंटरनेटवरील लस डेटाच्या संदर्भात प्रसिद्ध केलेले लेख वाचले पाहिजेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत ७० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत असं उत्तर त्यांनी टीकाकारांना दिलं आहे.
आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारची मंजुरी
कृष्णा इल्ला म्हणाले की, भारत सरकारच्या २०१९ च्या नियमांच्या आधारे भारत बायोटेक लसीचा आणीबाणी वापर करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेकने प्रथम झिका विषाणूचा शोध लावला. भारत बायोटेक ही झिका आणि चिकनगुनिया लसींसाठी जागतिक पेटंट दाखल करणारी पहिली कंपनी आहे.