काँग्रेस सध्या देशाच्या अनेक राज्यांतून भारत जोडो न्याय यात्रा काढत आहे. हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईत संपेल. या प्रवासादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी अनेक राज्यांतून जाणार आहेत. या दरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर वारंवार निशाणा साधला आहे. मात्र आता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे" असं म्हटलं आहे.
प्रल्हाद जोशी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेस भारताविरोधात भारतीयांना एकत्र करत आहे. काँग्रेस याला भारत जोडो म्हणतं पण त्यांचा खरा अजेंडा हा भारत तोडो असा आहे. NDA ने UPA पेक्षा कर्नाटकला 247% जास्त दिलं आहे आणि फक्त विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे. आमचं राजकारण विकासासाठी आहे. त्यांचं फक्त राजकारण, विकास विसरा!" असं प्रल्हाद जोशी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आता ओडिशामध्ये पोहोचली आहे. ओडिशामध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी राज्यातील जनतेला विशेष आवाहनही केलं. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मी यात्रेदरम्यान सात ते आठ तास लोकांचे ऐकतो आणि दररोज 15 मिनिटे त्यांना संबोधित करतो."
लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रवास सुरू केल्याचं राहुल यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रा 2022-23 मध्ये देशाला एकत्र आणण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर असं सुमारे 4,000 किलोमीटर अंतर प्रवास करण्यात आला आणि हा प्रवास “द्वेष आणि अन्यायाविरुद्ध” होता. लाखोंच्या संख्येने या यात्रेत लोक सहभागी झाले होते. त्यामुळेच ही यात्रा यशस्वी झाली.