नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नव्या पदयात्रेची सविस्तर माहिती समोर आली आहे. या यात्रेचे नाव "भारत जोडो न्याय यात्रा" असे असणार आहे. ही यात्रा देशातील एकूण 15 राज्यांमधून जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी हे जवळपास 6700 किलोमीटरचा पायी प्रवास करतील. सर्वात लांबचा प्रवास हा उत्तर प्रदेशमधील असणार आहे. उत्तर प्रदेशात राहुल गांधी 1074 किलोमीटरचा प्रवास करतील. या यात्रेच्या कालावधीत राहुल गांधी 11 दिवसांत उत्तर प्रदेशातील 20 जिल्हे कव्हर करणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रवास 14 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता मणिपूरमधील इंफाळ येथून सुरू होईल. मणिपूरनंतर ही भारत जोडो न्याय यात्रा नागालँड, त्यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश आणि परत आसाममधून मेघालयमध्ये जाणार आहे. यानंतर भारत जोडो न्याय यात्रा ही बंगाल आणि नंतर बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात जाणार आहेत. या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाने भारत आघाडीतील सर्व पक्षांना निमंत्रित केले आहे.
आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची 3 तास बैठक झाली. या बैठकीला आज सर्व प्रदेशाध्यक्ष आणि सीएलपी नेते उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, पहिल्यांदा निघालेली भारत जोडो यात्रा ही आपल्या देशाच्या आणि पक्षाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली. भारत जोडो यात्रा ही परिवर्तनाची पदयात्रा होती. देशात मोठा बदल झाला, संघटनेत नवसंजीवनी आली, असे बैठकीनंतर सांगण्यात आले.
भारत जोडो न्याय यात्रेचे संपूर्ण शेड्यूल...- पश्चिम बंगालमध्ये 5 दिवस आणि 7 जिल्हे.- बिहारमध्ये 4 दिवस आणि 7 जिल्हे.- झारखंडमध्ये 8 दिवस आणि 13 जिल्हे.- छत्तीसगडमध्ये 536 किमी, 5 दिवस आणि मधील 7 जिल्हे.- उत्तर प्रदेशमध्ये 1074 किमी, 20 जिल्ह्यांमध्ये 11 दिवसांचा मुक्काम.- राजस्थानमध्ये 128 किमी, 1 दिवस आणि 2 जिल्हे.