Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. भारत जोडो न्याय यात्रा गुवाहाटी शहरातून जाणार होती. तथापि, प्रशासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे यात्रा शहराजवळ येताच पोलिसांनी ती अडवली. तेव्हा संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांनी बॅरिकेड्स तोडले. मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी या घटनेला नक्षलवादी कृत्य संबोधत कार्यकर्त्यांना बॅरिकेड्स तोडण्यासाठी चिथावल्याबद्दल राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले. यानंतर आता राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दांत पलटवार केला.
पोलिसांनी कामकाजाच्या दिवसाचे कारण देत राहुल यांच्या यात्रेला शहरात प्रवेशास नकार दिला होता. यात्रा शहरात आल्यास वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल, असे कारण सांगून पोलिसांनी यात्रा राष्ट्रीय महामार्गावरून नेण्याचे निर्देश दिले होते. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या चकमकीत अनेक जण जखमी झाले. आसाम सरकारच्या या कृत्याचा देशभरात काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. यावर आता राहुल गांधी यांनी भाष्य करत टीका केली.
तुम्हाला हवे तेवढे गुन्हे दाखल करा
हिमंता बिसवा सरमा यांच्या डोक्यात ही गोष्ट कुठून आली की, राहुल गांधींना भीती घालू शकू, हे माहिती नाही. तुम्हाला हवे तेवढे गुन्हे दाखल करा, मी घाबरत नाही, २५ गुन्हे दाखल झाले आहेत, आणखी २५ दाखल करा, या शब्दांत राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिले आहे. राहुल गांधींची सुरक्षा पुन्हा पुन्हा धोक्यात असल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी आसाम पोलिसांवर आरोपही केले आहेत.
दरम्यान, मणिपूर ते मुंबई अशी १४ जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर असे काही प्रसंग आले की, आसाम पोलिस राहुल गांधी यांचे संरक्षण करण्यासाठी पुढे आले नाहीत. अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून यात्रा नियोजित प्रमाणे पार पाडावी, अशी मागणी खरगे यांनी केली.