नियोजित वेळेच्या 4 दिवस आधी 'भारत जोडो न्याय यात्रा' संपणार, मुंबईत INDIA आघाडीची सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 04:07 PM2024-03-05T16:07:32+5:302024-03-05T16:09:06+5:30
Bharat Jodo Nyay Yatra News: काँग्रेस पक्षाची 'भारत जोडो न्याय यात्रा' 14 जानेवारी 2024 रोजी मणिपूर येथून सुरू झाली.
Congress Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो न्याय यात्रे'ची सांगता 16 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 17 मार्च रोजी मुंबईत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक होईल. यामध्ये इंडिया आघाडीचे सर्व नेते सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, भारत जोडो न्याय यात्रा नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच संपत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीमुळे असे केले असावे, असे मानले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी 2024 रोजी मणिपूरमधून सुरू झाली. नियोजित वेळापत्रकानुसार यात्रा 20 मार्च रोजी संपणार होती, पण आता ही यात्रा 4 दिवस आधीच, 16 मार्च रोजी संपत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेचे नेतृत्व करत आहेत. या प्रवासात त्यांच्यासोबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणइ पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते सहभागी आहेत. या यात्रेद्वारे राहुल गांधी विविध राज्यात फिरुन केंद्र सरकारविरोधात लोकांची मने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
असा होता यात्रेचा प्रवास
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू झाली, त्यानंतर ही यात्रा इतर ईशान्येकडील राज्ये नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाममार्गे पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. ईशान्येतील न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसने मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर ही यात्रा आसाममध्ये पोहोचली तेव्हा पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. आसाममार्गे ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचली, पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यात सहभागी झाल्या नाहीत.
यानंतर यात्रा बिहारमध्येही गेली अन् तेथील महाआघाडीचे सरकार कोसळले. नितीशकुमार पुन्हा जेडीयूसोबत एनडीएमध्ये सामील झाले. हा प्रवास पुढे झारखंड आणि ओडिशा आणि छत्तीसगडमध्येही झाला. त्यानंतर यात्रा पूर्व यूपीमार्गे उत्तर प्रदेशात दाखल झाली. येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव या यात्रेत सहभागी झाले होते. सध्या भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशात सुरू असून त्यात दिग्विजय सिंह, कमलनाथ आणि जितू पटवारी सहभागी झाले आहेत.
आता यात्रा कोणत्या राज्यांमधून जाणार?
राहुल यांची न्याय यात्रा मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमार्गे गुजरातमध्ये पोहोचणार आहे. येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल आणि नंतर मालेगाव, नाशिक, ठाणे मार्गे मुंबई येथे संपेल. या प्रवासातील बहुतांश प्रवास बसने केला गेला, तर काही ठिकाणी राहुल पायी प्रवास करताना दिसले.