राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पोहोचली आहे. वाराणसीतील जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "देशात द्वेषाचे वातावरण आहे. हा देश द्वेषाचा देश नाही. मी भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत गेलो. माझ्या प्रवासादरम्यान मला हजारो लोक भेटले. देशात भीतीचे वातावरण आहे."
पदयात्रेदरम्यान राहुल गांधींनी लोकांना संबोधित केलं. "भारत जोडो यात्रा सुरू करून एक वर्ष झाले आहे. मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो. या 4 हजार किलोमीटरच्या प्रवासात मला हजारो लोक भेटले. लाखो लोक पायी चालत आले हे तुम्ही पाहिलं असेल. या प्रवासादरम्यान दर कोणी पडलं, थकलं तर त्याला उचललं जायचं. शेतकरी आले, मजूर आले, छोटे व्यापारी आले, बेरोजगार तरुण आले, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं."
"संपूर्ण भारत जोडो यात्रेत कुठेही द्वेष दिसला नाही"
"जेव्हा छोटे व्यापारी मला भेटायचे तेव्हा ते म्हणायचे की, उद्या काय होईल याची आम्हाला भीती वाटते. संपूर्ण यात्रेत मला कुठेही द्वेष दिसला नाही. भाजपाचे लोक यायचे, आरएसएसचे लोक यायचे. यात्रेदरम्यान ते भेटायचे. भेट देताच ते प्रेमाने बोलायचे. हा देश द्वेषाचा देश नसून प्रेमाचा देश आहे. एकत्र काम केले तरच मजबूत होतो" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"एकमेकांना जोडून ठेवणं ही देशभक्ती"
"जेव्हा घरात भाऊ भांडतात तेव्हा घर कमकुवत होतं. तसेच देशात एकमेकांशी भांडलो तर देशही कमजोर होईल. एकमेकांना जोडून ठेवणं ही देखील देशभक्ती आहे. मी इथे अहंकाराने आलो नाही. मी माझ्या प्रवासापूर्वी टीमला सांगितले होतं की. प्रवासात अनेक आव्हाने असतील. लोक मला भेटायला येतील, गरीब लोक येतील, श्रीमंत लोक येतील. प्रत्येकजण येईल, जो येईल त्याला वाटावं की मी माझ्या घरी आलो आहे, माझ्या भावाला भेटायला आलो आहे. मला प्रेमाने भेटा. जेव्हा आम्ही ते करत होतो तेव्हा थकवा नव्हता, कारण त्या प्रवासात देशाची शक्ती आमच्या सोबत होती" असंही राहुल यांनी सांगितलं आहे.