भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली आहे. आज ही यात्रा वाराणसी आणि प्रयागराज मार्गे प्रतापगडला पोहोचली आहे, जी आजच राहुल गांधींचा माजी संसदीय मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये पोहोचेल. यात्रेला उत्तर प्रदेशात दाखल होऊन तीन दिवस झाले असले तरी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव अद्याप यामध्ये सहभागी झालेले नाहीत. याबाबत आता जयराम रमेश यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे.
काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "उद्या अखिलेश यादव भारत जोडो यात्रेत सहभागी होतील अशी आशा आहे. अपना दल (कमेरवादी) नेत्या पल्लवी पटेलही आमच्या यात्रेत सहभागी झाल्या होत्या."
जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, "भारत जोडो न्याय यात्रेचा आज 37 वा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आज बाबूगंजमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आम्ही आज रात्री अमेठीत राहू आणि सकाळी रायबरेलीला जाणार आहोत. त्यानंतर उद्या लखनौमध्ये राहू. आम्ही दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये थांबू. त्यानंतर 22 आणि 23 फेब्रुवारीला विश्रांती घेऊ."
राहुल गांधींसोबत प्रियंका गांधीही आज अमेठीमध्ये दिसणार आहेत. यापूर्वी 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी सांगितलं होतं की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मला बरं वाटल्यावर मी या यात्रेत सहभागी होईन. तोपर्यंत चंदौली-बनारसला पोहोचणाऱ्या सर्व लोकांनी पूर्ण मेहनत घेऊन यात्रेची तयारी सुरू ठेवावी.