...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 08:13 AM2024-02-25T08:13:05+5:302024-02-25T08:13:52+5:30
Rahul Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोबाईल वरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मुरादाबाद, अमरोहा येथून संभलमध्ये पोहोचली. यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे स्वागत केले.
राहुल गांधी यांनी येथे सभेला संबोधित करताना एका तरुणाला विचारले की, तू दिवसभर किती वेळ मोबाईल चालवतो. त्यावर तो तरुण म्हणाला की, १२ तास. त्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, भारतात रोजगार नाही तेव्हाच तुम्ही १२ तास मोबाईल चालवता. तुम्हाला माहित आहे का? मोठमोठ्या व्यापाऱ्यांची मूलं रील पाहत नाहीत. तर २४ तास पैसे मोजतात. जर तुम्हाला रोजगार मिळाला तर तुम्ही अर्धातास रील पाहाल आणि १२ तास काम कराल.
अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय समाजातील व्यक्ती उच्च पदावर नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, जर आपण देशातील कुठल्याही कंपनीमधील कर्मचाऱ्यांची यादी काढली. मालकांची यादी काढली तर एकही मागास, दलित सापडणार नाही. माध्यमातील घराणी, रिपोर्टरची यादी काढली, खासगी कॉलेज आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची यादी काढली तर या पदांवरही उच्च जातींमधील तीन-चार टक्के लोक पदांवर असल्याचे दिसून येते. सध्या देशांमध्ये छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर संपवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.