Bharat Jodo Nyay Yatra ( Marathi News ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला भारत जोडो न्याय यात्रा असं नामकरण करण्यात आलं असून मणिपूरपासून हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र आता ही यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर भाजप आणि काँग्रेसदरम्यान संघर्ष निर्माण झाला आहे. कारण माझ्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप या यात्रेमध्ये सहभागी झालेले काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ज्या मार्गावरून जाणार होती, त्याच मार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. राहुल गांधी सदर परिसरात पोहोचण्याआधी या मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेल्या जयराम रमेश यांच्या वाहनाला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणाबाजी सुरू केली. याबाबतचा व्हिडिओ जयराम रमेश यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.
भाजपवर हल्लाबोल करत जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, "काही मिनिटांपूर्वी माझ्या वाहनावर सुनितपूर इथं हल्ला झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या गाडीवर लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर्सही फाडले. आमच्यावर पाणी फेकत त्यांनी आमच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हेच असं कृत्य करत आहेत. मात्र आम्ही घाबरलेलो नसून मार्गक्रमण करतच राहू," अशा शब्दांत जयराम रमेश यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत अद्याप राहुल गांधींकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.