काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली आहे. मात्र आज या यात्रेला काही तासांसाठी ब्रेक लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे राहुल गांधी हे २०१८ मधील एका प्रकरणात सुल्तानपूरमधील एका स्थानिक कोर्टामध्ये हजर राहणार आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी भारत जोडो न्याय यात्रा काही काळासाठी थांबणार आहे. कारण राहुल गांधी हे मानहानीच्या एका प्रकरणामध्ये सुल्तानपूरच्या एका स्थानि कोर्टात हजर राहणार आहेत. याबाबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी लिहिले की, भारत जोडो न्याय यात्रेला सोमवारी ३७ दिवस झाले आहेत, मात्र ही यात्रा मंगळवारी सकाळी थोड्या काळासाठी थांबणार आहे. दुपारी दोन वाजता अमेठी येथील फुरसतगंज येथून पुन्हा सुरू होईल. राहुल गांधी मंगळवारी सकाळी ११ वाजता सुलतानपूरच्या स्थानिक कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.
२०१८ मधील एका प्रकरणात राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या एका कोर्टाने समन्स बजावलं आहे. २०१८ मध्ये राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत एक आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याविरोधात भाजपाचे नेते विजय मिश्रा यांनी तक्रार दिली होती. विजय मिश्रा यांचे वकील संतोष कुमारप पांडे यांनी सांगितले की, जर राहुल गांधी या प्रकरणात पुरावे मिळून दोषी ठरले तर त्यांना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.