मुंबई - एकीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेते खा. राहुल गांधींनाआसाममधील नगाव येथे मंदिरात जाण्यापासून रोखल्याने काँग्रेस समर्थन आक्रमक झाले होते. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेसने रस्त्यावरच ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. यादरम्यान, राहुल गांधींनी पुढील महिनाभरात काँग्रेसकडून एक कार्यक्रम घोषित केला जात असून ५ स्तंभांवर आधारीत हा कार्यक्रम असणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी 'भारत जोडो न्याय यात्रे'ला गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बॅरिकेड्स तोडले, घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी बळाचाही वापर केल्याचं दिसून आलं. त्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचा उद्देश समजावून सांगितला.
आम्ही मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान अद्यापही तेथे गेले नाहीत. आम्ही मणिपूरमधून अरुणाचल प्रदेशात गेलो, नागालँडनंतर आता आसाममध्ये आलो आहोत. तुम्ही पाहाताय येथे काय सुरू आहे. आमच्या भारत जोडो न्याय यात्रेमागे न्यायाची संकल्पना आहे. त्यामध्ये, ५ स्तंभ आहेत, जे देशाला ताकद देतील.
1. युवा न्याय2. भागीदारी3. नारी न्याय4. शेतकरी न्याय 5. कामगारांसाठी न्याय
भारत जोडो न्याय यात्रेची अशी ही ५ स्तंभांची संकल्पना असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. तसेच, या स्तंभासाठी काँग्रेसकडून पुढील महिनाभरात एक कार्यक्रम घोषित केला जाणार असल्याचंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.
आसाम सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल
या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुवाहाटीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, यावेळी जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "बजरंग दल याच मार्गाने गेला होता. याच मार्गावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची रॅलीही झाली होती. येथे एक बॅरिकेड होते, आम्ही बॅरिकेड तोडले पण कायदा मोडणार नाही. आम्हाला कमकुवत समजू नका. ही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद आहे. आसाममधील लोकांना दडपले जात आहे. विद्यार्थ्यांसोबत मला चर्चा करू दिली जात नाही. काँग्रेस कार्यकर्ते हे भाजप आणि आरएसएसला घाबरत नाहीत.", अशा शब्दात राहुल गांधींनी आसाम सरकारवर तोफ डागली.