लखनौ - भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या प्रादेशिक भारत जोडो यात्रेमध्ये झालेल्या वादानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण केली. एकमेकांवर दगड-गोटेही फेकले. दोन गटांमध्ये झालेल्या या हाणामारीमुळे घटनास्थळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पदयात्रेतील या वादावादीचा फटका पादचारी आणि रस्त्यावरील छोट्या दुकानदारांना बसला.
मिळत असलेल्या माहितीनुसार पार्टीमध्ये पीसी सदस्य आणि माजी प्रधान यांचे दोन गट यात्रेदरम्यान प्रदेश प्रभारी अजय राय यांच्यासोबत चालण्यावरून एकमेकांशी भिडले. एएसपी समर बहादूर यांनी सांगितले की, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान, मुख्य पाहुण्यांसोबत चालण्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करून अराजक पसरवणाऱ्या दोघांना घटनास्थळावरून अटक केली आहे. तर इतरांचा शोध घेतला जात आहे. ही घटना कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरवारी परिसरात घडली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर रवाना झालेले असताना प्रादेशिक पातळीवर स्थानिक काँग्रेस नेते आपापल्या जिल्ह्यामध्ये भारत जोडो यात्रा काढत आहेत. त्यात कौशांबी जिल्ह्यातील भरवारी नगरपालिकेच्या रोही बायपासपासून भरवारी येथून ही यात्रा निघाली होती. या यात्रेचं नेतृत्व प्रदेश प्रभारी अजय राय हे करत होते. बायपासजवळून सुरू झालेली ही यात्रा भरवारी रेल्वे फाटकाजवळ पोहोचली. यादरम्यान, काँग्रेसचे पीसीसी सदस्य आणि प्रयागराजमधील हटवा येथील माजी सरपंचांचे समर्थक अजय राय यांच्यासोबत चालण्यावरून आपापसामध्ये भिडले. बघता बघता ही बाचाबाची हाणामारीमध्ये परिवर्तित झाली.
रस्त्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसामध्ये एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडगोटे मारताना दिसले. त्यामुळे पदयात्रेमध्ये अफरातफर माजली. एएसपी समर बहादूर यांनी सांगितले की, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान, प्रमुख पाहुण्यांसोबत चालण्यावरून काँग्रेसच्या दोन गटात ही हाणामारी झाली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ फुटेजच्या आधारावर इतरांना अटक करण्यात येईल.