‘भारत जोडो यात्रेकडून देशाला आशा,’ सत्यपाल मलिकांकडून राहुल गांधींची स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 08:12 PM2022-09-09T20:12:05+5:302022-09-09T20:12:41+5:30
पंतप्रधान प्रत्येक तिसऱ्या दिवशी उद्घाटन करत असतात. त्या दिवशी काही नव्हतं म्हणून राजपथाचं नाव बदललं आणि त्यांनी याचं उद्घाटन केलं, मलिक यांचा टोला.
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची स्तुती केली आहे. तसेच त्यांची ‘भारत जोडो यात्रा’ देशासाठी काही चांगले करेल अशी आशा असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी सत्यपाल मलिक यांनी अनेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे. यावेळी मलिक यांनी राहुल गांधींचे केवळ कौतुकच केले नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मलिक यांनी निशाणा साधत पंतप्रधान मोदी प्रत्येक तिसऱ्या दिवशी काहीतरी उद्घाटन करत असतात. कदाचित त्या दिवशी काहीच नसेल म्हणून त्यांनी राजपथाचं नाव बदललं असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील मुधी बाकापूर गावात एका कार्यक्रमादरम्यान एका सभेला संबोधित करताना सत्यपाल मलिक म्हणाले की काँग्रेस नेते राहुल गांधी चांगले काम करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर देशात अनेक यात्रा झाल्या आहेत का आणि त्या सर्वांचे चांगले परिणाम मिळाले आहेत असा सवाल मलिक यांना करण्यात आला. "मला आशा आहे की या यात्रेचे (भारत जोडो यात्रेचे) देशासाठी काही चांगले परिणामही होतील. आपण पंतप्रधानांच्या विरोधात नाही. परंतु त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर त्यांनी काम केलं तर ते त्यांच्या फायद्याचे ठरतील,” असे ते म्हणाले.
नावबदलायचीगरजनव्हती
राजपथाचं नाव बदलण्याची गरज नव्हतं. जरा त्यांनी दावा केला होता हे नाव देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलं होतं, इंग्रजांनी नाही, असंही मलिक म्हणाले. पंतप्रधान प्रत्येक तिसऱ्या दिवशी उद्घाटन करत असतात. कदाचित गुरूवारी काहीही ठरवण्यात आलं नव्हतं. म्हणून राजपथाचं नाव बदललं आणि त्यांनी याचं उद्घाटन केलं, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.