नवी दिल्ली - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून शिवसेनेने स्वागत केले आहे. शेकडो शिवसैनिक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. दिल्लीत यात्रा आल्यानंतर आमचे खासदार सहभागी झाले. काश्मीर, पंजाबमध्ये यात्रा पोहचल्यानंतर मी सहभागी होईन असं बोललो होतो. राहुल गांधी श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवणार आहेत ही ऐतिहासिक गोष्ट आहे. हजारो तरुण, वृद्ध महिला यात्रेत सहभागी झालेत. ही राजकीय इव्हेंट नाही असं कौतुक खासदार संजय राऊतांनी केले आहे.
संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या टीशर्टवरून वाद निर्माण करणाऱ्यांनीही फटकारलं आहे. राऊतांनी म्हटलं की, कपड्यावरून कसले वाद करता? राहुल गांधी तपस्वीप्रमाणे यात्रा करतायेत अशी लोकांची भावना आहे. त्या भावनेला तडा देण्याचं काम काहीजण करतायेत. सत्ताधाऱ्यांनी धसका घ्यावा अशी भारत जोडो यात्रा आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व उजळून निघालं आहे. या यात्रेचा फायदा देशातील लोकशाहीला मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी करून दाखवली. ही एका राजकीय पक्षाची यात्रा नसून देशातील लाखो कोट्यावधी लोकांची भावनेतून ही यात्रा निघाली आहे असं त्यांनी सांगितले.
महाशक्तीनं हस्तक्षेप न केल्यास न्याय मिळेलआम्ही सत्यापलीकडे काही मागत नाही. सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आला. वारेमाप पैशांचा वापर करण्यात आला. आमदारांवर अपात्रतेची कारवाई याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. या खटल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तारखांवर तारखा पडतायेत आणि राज्यातील घटनाबाह्य सरकार मिश्किलपणे हसतंय. महाशक्तीमागे असली तरी आमचा देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं राऊतांनी सांगितले.
त्याचसोबत निकाल पहिल्याच दिवशी लागू शकला असता. घटनाबाह्य सरकार चालत असेल तर रोखणे संविधानाचं काम आहे. फेब्रुवारी शेवटापर्यंत या प्रकरणाचा निकाल लागू शकतो. सत्ताधाऱ्यांनी कानातील बोळे काढा. न्यायालयाचा निकाल फेब्रुवारीपर्यंत लागणे अपेक्षित आहे. सरकार पाडून दाखवा काय ते पडेल. हे जिवंत सरकार नाही. सरकारचा मृत्यू झालाय. कुठलेही अडथळे आले नाही तर सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. न्यायव्यवस्था स्वायत्त संस्था आहे. विश्वास असायला हवा. महाशक्तीचा हस्तक्षेप नसेल आणि सर्वकाही नियमाप्रमाणे होणार असेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सत्याप्रमाणे न्याय मिळेल असंही संजय राऊत म्हणाले.