Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना बॉम्बने उडवू, भारत जोडो यात्रेदरम्यान धमकी देणाऱ्या त्या पत्रामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:56 PM2022-11-18T12:56:51+5:302022-11-18T12:57:59+5:30
Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल होणार आहे. तत्पूर्वी इंदूर येथे राहुल गांधींना बॉम्बने उडवून जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे.
भोपाळ - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानांमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहेत. त्यातच आता राहुल गांधी यांची ही यात्रा पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल होणार आहे. तत्पूर्वी इंदूर येथे राहुल गांधींना बॉम्बने उडवून जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता पोलीस या पत्राचा तपास करत आहेत.
राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र इंदूर येथे सापडले आहे. आज सकाळी एका मिठाईच्या दुकानाबाहेर सापडले आहे. एका अज्ञात व्यक्तीने हे पत्र दुकानाबाहेर टाकले होते. आता पोलीस आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून त्याआधारवर आरोपीचा शोध सुरू केला आहे. या पत्रामध्ये भारत जोडो यात्रा ही इंदूर येथे आल्यावर राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आज भारत जोडो यात्रेचा ७२ वा दिवस आहे. ही यात्रा आज शेगावमध्ये असून तिथे राहुल गांधी यांची सभा होणार आहे. दरम्यान, ही यात्रा २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जळगाव जामोद येथून मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूरमध्ये प्रवेश करेल.