नवी दिल्ली:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी त्यांचे दिवंगत वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समाधीला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झालेल्या 'भारत जोडो' यात्रेच्या सुरुवातीपासून राहुल गांधी केवळ पांढरा टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. राजधानीतील कडाक्याच्या थंडीमध्येही ते टी-शर्टवरच दिसले. यावरुन त्यांना थंडी वाजत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजीव गांधी यांच्यानंतर राहुल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधी 'राजघाट', देशाचे पहिले पंतप्रधान आणि त्यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांची समाधी 'शांतिवन', आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची समाधी 'शक्तीस्थळ', देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची समाधी 'विजय घाट' आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची समाधी 'सदैव अटल' येथेही जाऊन आदरांजली वाहिली.
राहुल गांधी काय म्हणाले?तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सुरू असलेली 'भारत जोडो' यात्रा उत्तर भारतात पोहोचल्यापासून राहुल गांधींना थंडी वाजत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्तर भारतातील बहुतांश भागात अनेक दिवसांपासून तापमान 10 अंशांच्या खाली आहे. सर्दी सहन करण्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, “ते मला सतत विचारतात की मला थंडी का वाजत नाही का विचारतात...पण शेतकरी, कामगार, गरीबांना हा प्रश्न विचारत नाहीत..." असा टोला राहुल यांनी लगावला.
रविवारी लाल किल्ल्यावर जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते, "मी 2800 किलोमीटर चाललो आहे, पण हे फार मोठे काम नाही... शेतकरी, शेतमजूर रोज खूप चालतात. मी कन्याकुमारीहून इथे (दिल्ली) आलो, पण मला सामान्य लोकांमध्ये 'द्वेष' दिसला नाही, मला लोकांमध्ये भीती दिसली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वेष आणि भीती पसरवत आहेत", असा आरोप राहुल यांनी यावेळी केला.