Bharat Jodo Yatra: भारतातील आदिवासींना वनवासी म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींना आदिवासींची जमीन घेऊन, आपल्या व्यापारी मित्रांना द्यायची असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आदिवासी हेच भारताचे खरे मालक असल्याचेही राहुल म्हणाले.
राहुल गांधींचीभारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी महिला कामगार परिषदेला संबोधित करताना राहुल म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासीं नागरिकांसाठी वनवासी हा शब्द वापरला होता. पण, या दोन्ही शब्दांचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. आदिवासी हा शब्द सांगतो की, तुम्ही भारताचे खरे मालक आहात आणि वनवासी हा शब्द सांगतो की तुम्ही सर्व जंगलात राहता.
आदिवासींना हक्क देणारा काँग्रेस सरकारचा कायदा केंद्र सरकारने कमकुवत केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते म्हणाले की मोदी सरकार पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) कायदा, वन हक्क कायदा, जमीन हक्क, पंचायत राज कायदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण यासारखे कायदे कमी करत आहे. आमचे सरकार आल्यावर हे कायदे पुन्हा मजबूत करू, असा दावाही त्यांनी यावेळी केला.