माजी राष्ट्रपती, मुत्सद्दी नेते, काँग्रेसचे अनेक अडचणींच्या काळातील ‘संकटमोचक’ भारतरत्नप्रणव मुखर्जी यांचे सोमवारी सायंकाळी येथील लष्करी इस्पितळात दीर्घ आजाराने निधन झाले. गेले तीन आठवडे सुरू असलेली त्यांची मृत्यूशी झुंज थांबली आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडून गेला. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनावरील राष्ट्रध्वज लगेच अर्ध्यावर उतरविण्यात आला. राष्टÑपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रणवदांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहेएक आठवडा राष्ट्रीय दुखवटाप्रणव मुखर्जी यांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्र सरकारने एक आठवडा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात कोणतेही सरकारी समारंभ वा कार्यक्रम होणार नाहीत. त्यांच्या निधनाबद्दलसुटी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.‘प्रणबदा’ या नावाने सर्वांना परिचित असलेले मुखर्जी ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात शर्मिष्ठा हा मुलगी आणि अभिजित व इंद्रजीत हे दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांची पत्नी सुव्रा यांचे मुखर्जी राष्ट्रपती असताना सन २०१५ मध्ये निधन झाले होते.घरात पडून दुखापत झाल्याने प्रणबदांना १० आॅगस्ट रोजी इस्पितळात दाखल केले गेले. तपासण्या केल्या असता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे व त्यांच्या मेंदूत गाठ आल्याचे निष्पन्न झाले. त्यादिवशी कोरोना संसर्गाची माहिती स्वत: मुखर्जी यांनी टष्ट्वीट करून दिली होती. त्यानंतर तीन दिवसांनी मेंदूवर शस्त्रक्रिया केल्यापासून मुखर्जी बेशुद्ध होते. गेले अनेक दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळीच डॉक्टरांनी फुफ्फुसात पू झाल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावल्याचे निवेदन प्रसिद्ध केले. तेव्हा त्यांचे थोरले चिरंजीव अभिजित यानी देशवासियांच्या प्रार्थना व आशिर्वादाने आपले वडील नक्की बरे होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु त्यानंतर काही तासांतच त्यांच्यावर आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी जाहीर करण्याचे दुर्दैव ओढवले.प्रणव मुखर्जी २५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७ अशी पाच वर्षे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित अशा प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या नरेंद्र यांना पंतप्रधानपदाची पहिली शपथ प्रवबदांनीच दिली होती. तेव्हापासून मोदी व मुखर्जी यांच्यात, विचारसरणी भिन्न असूनही एक विशेष स्नेहबंध जुळला व तो अखेरपर्यंत कायम राहिला. आपल्या मतांवर ठाम राहूनही पक्षातीत मैत्री करणे ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू होती. म्हणूनच ५० हून अधिक वर्षांच्या राजकीय कारकिर्दित अनेक स्थित्यंतरे होऊनही प्रणबदा आजातशत्रू राहिले. प्रखर बुद्धिमत्ता, प्रकांड व्यासंग आणि मीतभाषी स्वभावाने मुखर्जी यांनी सर्वांना आपलेसे केले.आता बांगलादेशात असलेल्या एका छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या प्रणबदांची जीवनगाथा कोणालाही स्फूर्तिदायी ठरावी अशीच आहे. सात वेळा संसदेवर निवडून आलेल्या मुखर्जी यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी व डॉ. मनमोहन सिंग अशा तीन पंतप्रधानांच्या काळात संरक्षण, वित्त, परराष्ट्र व व्यापारी अशी जोखमीची खाती समर्थपणे सांभाळून इतिहासावर ठसा उमटविला. त्यांच्याच सांगण्यानुसार पंतप्रधान होण्याची मुखर्जी यांची संधी दोन वेळा थोडक्यात हुकली. प्रथम इंदिरा गांधींच्या हत्येनंतर व नंतर डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा. मधला काही वर्षांचा अल्प काळ सोडला तर प्रणबदा काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांंचे जाणे हा एका युगाचा अंत आहे. सार्वजनिक जीवनातील ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते व एखाद्या तपस्वी ऋषीप्रमाणे त्यांनी भारतमातेची सेवा केली. त्यांच्या ठायी परंपरा व आधुनिकतेचा उत्तम मिलाफ होता. पाच दशकांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात उच्च पदे भूषवूनही त्यांचे जमिनीशी नाते कधी तुटले नाही. देशाला एक सुपुत्र गमावल्याचे दु:ख झाले आहे. -रामनाथ कोविंद, राष्ट्रपतीभारत रत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारत दु:खसागरात बुडून गेला आहे. देशाच्या विकासयात्रेवर त्यांनी स्वत:ची अमिट छाप सोडली. प्रकांड बुद्धिमत्तेचे विद्वान व उत्तुंग राजधुरंदर अशा प्रणबदांना सर्वच राजकीय पक्षांत व समाजाच्या सर्व थरांमध्ये नितांत आदर होता. -नरेंद्र मोदी, पंतप्रधाननिष्कलंक सेवा आणि भारतमातेसाठी केलेल्या अमूल्य कार्यासाठी प्रणबदांचे आयुष्य चिरंतन स्फूर्ती देत राहील. भारताच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे.-अमित शहा, केंद्रीय गृहमंत्रीमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या दुर्दैवी निधनाने देशाला अतीव दु:ख झाले आहे. देशासोबत माझीही त्यांना श्रद्धांजली.-राहुल गांधी, काँग्रेस नेते
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 6:30 AM