चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाला भुईसपाट करीत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर भगवा फडकविला आहे. भाजपने ४८ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीतही खाते उघडता आलेले नाही.
भाजपने दिल्लीची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली होती. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीचे व्यवस्थापन सांभाळले होते. भाजपने निवडणुकीच्या प्रचारात भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांची फौज उतरविली होती. यात आपचे पानिपत झाले. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून ३० हजार ८८ मते मिळवत अरविंद केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. केजरीवाल यांना २५९९९ मते मिळाली.
दिल्ली निवडणुकांत भाजप, मित्रपक्षांना मिळालेला विजय हा विकास, उत्तम कारभाराला मिळालेली पोचपावती आहे. दिल्लीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे सरकार कसून प्रयत्न करेल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मुख्यमंत्रिपदासाठी कोण चर्चेत?
प्रवेश वर्मा : माजी खासदार तथा भाजपचे दिल्लीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी केजरीवाल यांचा पराभव केला.
विजेंद्र गुप्ता : दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष. आपचे वर्चस्व असूनही २०१५, २०२० मध्ये त्यांनी यश मिळविले होते. दिल्ली विधानसभेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सांभाळले आहे.
सतीश उपाध्याय : भाजपचा दिल्लीतील महत्त्वाचा चेहरा. ते पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, दिल्ली युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि एनडीएमसीचे उपाध्यक्ष होते. प्रशासकीय अनुभवासह त्यांनी पक्षसंघटनेत विविध पदांवर काम केले आहे.
आशिष सूद : भाजपचा दिल्लीतील पंजाबी चेहरा मानले जातात. ते दिल्ली भाजपचे सरचिटणीस होते. गोवा, काश्मीरमध्ये भाजपच्या संघटनात्मक गोष्टींची काही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जितेंद्र महाजन : जितेंद्र महाजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यानंतर ते राजकारणात आले. रोहतास नगर मतदारसंघात आपच्या उमेदवार सरिता सिंह यांचा त्यांनी पराभव केला.
सहापट विजयी उमेदवार
भाजपने २०२०च्या तुलनेत आता सहा पटीने विजय मिळविला आहे. २०२०मध्ये भाजपचे आठ आमदार निवडून आले होते. आता भाजपचे ४८ आमदार निवडून आले आहेत. भाजपला ४० जागांचा फायदा झाला आहे. आपला ४० जागांचा फटका बसला. भाजपला ४५.५६ टक्के मते मिळाली असून २०२० च्या तुलनेत ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. आपला ४३.५७ टक्के मिळाली आहेत. काँग्रेसला ६.३४ टक्के मते मिळाली.