उज्जैन: भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्य उज्जैनमध्ये बाबा महाकालच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी महाकाल मंदिरात मोठा राडा घातला. तेजस्वी यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने भाजयुमोचे कार्यकर्ते महाकाल मंदिरात पोहोचले. सकाळी साडेदहाच्या सुमारास तेजस्वीसोबत काही कार्यकर्ते मदिराच्या गर्भगृहात गेले तर काहींना बाहेर थांबावे लागले. यावेळी नाराज कार्यकर्त्यांनी मंदिराचे बॅरिकेड्स तोडून नंदी हॉलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन करत नंदी हॉलमध्ये प्रवेश केला. यादरम्यान मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मंदिरात उपस्थित भाविकांसोबत धक्काबुक्की झाली आणि बराच वेळ हा गोंधळ सुरूच होता. या गोंधळामुळे मंदिरात आलेल्या भाविकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या सर्व गोंधळादरम्यान मंदिर समिती किंवा प्रशासनाचा एकही अधिकारी तेथे उपस्थित नव्हता.
अधिकाऱ्यांनी फोन बंद केलेही घटना घडली तेव्हा शेकडो भाविक दर्शनासाठी आपली पाळी येण्याची वाट पाहत होते. मंदिरातील परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांना फोन केला असता सर्वांचे फोन बंद असल्याचे आढळून आले. ज्या अधिकाऱ्यांचा फोन लागला त्यांनी फोनला उत्तर दिले नाही. दरम्यान, महाकाल मंदिरात श्रावणात कोणालाही गर्भगृहात प्रवेश करण्यास बंदी आहे. पण, इंदूरचे आमदार रमेश मेंडोला यांनी गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेतले. त्यावर मंदिर प्रशासनाने गर्भगृहाचे निरीक्षक विजय डोडिया आणि प्रोटोकॉल कर्मचारी घनश्याम हाडा यांना निलंबित केले.