ऑनलाइन लोकमत
सांगारेड्डी, दि. १ - स्वप्नातही कोणाची तुरुंगात जाण्याची इच्छा नसते. कारण एकदा तुरुंगवारीचा शिक्का बसला तर, आयुष्याची बरबादी सुरु होते असं म्हणतातं. पण 'इथे' तुम्ही एक वेगळा अनुभव म्हणून एकदिवस तुरुंगात घालवू शकता. त्यासाठी तुम्हाला दिवसाचे ५०० रुपये मोजावे लागतील.
तेलंगणच्या मेडक जिल्ह्यातील सांगारेड्डी येथील २२० वर्ष जुन्या मध्यवर्ती कारागृहात तुरुंग पर्यटनाची अनोखी योजना सुरु करण्यात आली आहे. 'फिल द जेल' या योजनेतंर्गत तुम्ही ५०० रुपये भरुन संपूर्ण दिवस तुरुंगात घालवू शकता. यामध्ये तुम्हाला कारागृहातील जीवनाचा अनुभव घेता येईल.
तुरुंगात आल्यानंतर तुम्हाला कैद्याचा खादीचा ड्रेस,स्टीलची थाळी आणि ग्लास दिला जातो. एक दिवसाच्या या कैद्यांसाठी कुठलेही काम ठरवलेले नसते, पण त्यांना बराक स्वच्छ करणे, झाडे लावणे अशी कामे करावी लागतात. हैदराबादमध्ये निझामाची राजवट असताना १७९६ साली हे जेल बांधण्यात आले.