साऱ्या देशाला अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, भारती पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर त्या लोकसभेत चर्चेदरम्यान बोलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
डॉ. भारती पवार यांनी बुधवारी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे आता महिला विकास आणि बाल कल्याण विभागाची धुरा देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या शपथविधीनंतर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये भारती पवार या लोकसभेतील चर्चेदरम्यान काही प्रश्न मांडताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्या मागील रांगेत भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि खासदार रक्षा खडसेही बसलेल्या दिसत आहेत. दरम्यान शेतकरी कर्जमाफीबद्दल फडणवीसांचे आभार व्यक्त करताना प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू येत होतं. तसंच त्यांना हसू इतकं अनावर झालं की त्या बाकाच्या खालीही जाऊन हसल्या. परंतु काही वेळातच त्या पुन्हा गंभीर झाल्या.